जळगाव जिल्हा परिषदच्या नव्या CEO करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार

एप्रिल 10, 2026 3:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२६ । जळगाव जिल्हा परिषदच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करिश्मा नायर (Karishma Nair) यांनी शुक्रवार, दि. १० एप्रिल रोजी पदभार स्वीकारला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते त्यांना पदभार देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Karishma Nair

जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची मुंबई येथे अभियान संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या पदावर बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज शुक्रवारी सकाळी करिश्मा नायर यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील आपल्या दालनात पदभार स्वीकारताच कामकाजाला सुरुवात केली.

पदभार स्वीकारताच ‘ॲक्शन मोड’

पदभार स्वीकारल्यानंतर करिश्मा नायर यांनी तत्काळ जिल्हा परिषदेच्या नवीन व जुन्या दोन्ही इमारतीतील सर्व विभागांना भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला. प्रत्येक विभागातील टेबलवर जाऊन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधत त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली आणि कामकाजाबाबत आवश्यक मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सक्रिय आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now