डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात नामांकित डॉक्टरांकडून रूग्णावर शस्त्रक्रिया आजपासून सूरू
जळगाव लाईव्ह न्यूज । पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात आयोजित तिरळेपणा मोफत शस्त्रक्रिया शिबीरात पहिल्याच दिवशी १५० जणांची तपासणी करण्यात आली. या शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून तपासणीसाठी रूग्णांची गर्दी होत आहे.

राष्ट्रीय बालस्वास्थ व जिल्हा अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने १९९ वे तिरळेपणा मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि १ व २ एप्रिल रोजी तपासणी देखिल करण्यात आली. पुण्याच्या तज्ञांची टीम आज दाखल झाली असून दीपप्रज्वलनाने शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.


याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर, विभागप्रमुख डॉ. एन.एस. आर्विकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. नि.तू. पाटील, डॉ. रेणूका पाटील, डॉ. निखील चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सकाळी ९ ते ५ यावेळेत सतत तीन वेळा लिम्का बुक रेकॉर्ड करणारे डॉ. मधुसूदन झंवर हे स्वत: रूग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया करीत आहे. त्यांच्यासमवेत २० डॉक्टरांची टीम देखील या शिबीरात सहभागी आहेत. वैद्यकीय रूग्णालयातील नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. एन.एस. आर्विकर, डॉ. निखील चौधरी यांच्या उपस्थितीत हे शिबीर होत आहे. शिबीरात १५० जणांची नोंदणी करण्यात आली असून त्यांची तपासणी देखील करण्यात आली आहे. दि. ३ ते ५ एप्रिल या कालावधीत गरजू रूग्णांवर मोफत तिरणेपणा शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
जिल्ह्यात प्रथमच तिरळेपणाचे शिबीर
जळगाव जिल्ह्यात प्रथमच डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मोफत तिरळेपणा तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे तपासणीसाठी रूग्णांची मोठी गर्दी होत आहे. तिरळेपणा दूर करण्यासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाने घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद ठरत आहे.






