जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकार्यांना काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काय कान मंत्र देतात? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्ह्यात कॉग्रेसतर्फे शिरीष चौधरी हेच आमदार म्हणून निवडून आले आहेत. दिड वर्ष उलटला परंतु पक्ष संघटना मजबूत करण्यात लोकप्रतिनिधींना फारसे यश आलेले दिसत नाही. त्यात दोन महिन्यांनी होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिलेल्या एकला चलोच्या नार्यामुळे पटोले हे जळगाव जिल्ह्यात कोणती रणनीती आखतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार का?
एकीकडे राज्य सरकारविरुध्द भाजपा जनसामान्यांचे प्रश्न घेऊन जनतेत जाताय तर राष्ट्रवादी व शिवसेनादेखील सरकारची कामे घेऊन आपापल्या पक्षामार्फत कार्यक्रम राबवत जनमतात चर्चेत राहत आहे परंतु काँग्रेस पक्षाची फारशी अॅक्टीव्हिटी दिसून येत नाही. यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणता कानमंत्र देतात याकडे लक्ष लागले आहे.
आगामी निवडणुकीत होणार अग्निपरीक्षा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात आणि त्यात खासकरून रावेर-यावल तालुक्यात चांगला परफॉर्मन्स देण्याची जबाबदारी प्रदेश उपाध्यक्ष असलेले आमदार शिरीष चौधरींकडे असणार आहे. त्यामुळे आमदार चौधरींनादेखील होम-ग्राउंडवर म्हणजेच पंचायत समिती, नगरपालिका तसेच जिल्हा परीषदेत जास्तीत-जास्त जागा जनमतातून काँग्रेस पक्षाला निवडून देण्याची अग्निपरीक्षा होणार आहे.