काळजी घ्या ! आगामी ३ ते ४ दिवस संकटाचे, महाराष्ट्रातील या भागाला येलो अलर्ट, जळगावात काय स्थिती?

मार्च 26, 2026 1:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या आठवड्यात राज्यात हवामान बदल होऊन अवकाळी पावसाने हजेरी लावली. अद्यापही काही ठिकाणी अवकाळी पावसाचं सावट असून मात्र अनेक ठिकाणी उष्णतेचा तडाखा पुन्हा वाढला आहे. जळगावसह काही जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळीशी जवळ पोहोचला असून यामुळे उष्णतेच्या झळा नागरिकांना बसत आहे. मात्र अशातच आता हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

rain

हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या जिल्ह्याना पावसाचा अंदाज?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विशेषतः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची नोंद झाली असून काही ठिकाणी गारपीट आणि जोरदार वाऱ्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच आता पुढील तीन ते चार दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी पिकांची योग्य काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, काही भागांत पावसाचा अंदाज असला तरी राज्यातील इतर भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आज उत्तर महाराष्ट्रातील हवामान उष्ण आणि कोरडे राहील. नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत उष्णतेचा पारा चढणार आहे. आज या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नाही. यामुळे उष्णतेच्या झळा जाणवणार आहेत.

जळगावचा पारा २८ मार्चपर्यंत ४० अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. बुधवारी जळगावचे कमाल तापमान ३८.५ अंश तर किमान तापमान २२ अंशावर पोहोचला आहे. यामुळे दिवसासह आता रात्रीच्याही उकाड्यात वाढ झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now