लग्नाहून परताना काळाचा घाला ; भीषण अपघातात जळगावातील दाम्पत्याचा मृत्यू

मार्च 26, 2026 10:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । लग्नाहून परतणाऱ्या जळगावातील दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील उमाळा–गाडेगाव दरम्यान अज्ञात वाहनाने स्कुटीला जोरदार धडक दिल्याने एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. मुझफ्फरअली सय्यद (६०) आणि ताहेराबी मुजफ्फरअली (५५, दोन्ही रा. पिंप्राळा हुडको, जळगाव), अशी मृतांची नावे आहेत. या अपघाताची सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांत कोणतीच अधिकृत नोंद झालेली नव्हती.

acd 1

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या पिंप्राळा हुडको परिसरात राहणारे मुझफ्फरअली हे मसाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बुधवारी चुलत भावाच्या मुलीचे लग्न असल्यामुळे ते पत्नी ताहेराबी यांच्यासोबत दुचाकीने जळगाव येथून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर येथे गेले होते. लग्न आटोपल्यानंतर जळगावकडे परत येत असताना, बुधवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील उमाळे ते गाडेगाव दरम्यानच्या पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी जोरात होती की दुचाकीसह दोघेही खाली फेकले गेले. भीषण अपघातात जखमी झालेल्या मुझफ्फर अली आणि ताहेराबी यांना तातडीने खाजगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले. पण, यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता दोघांना मयत घोषित केलं.

या घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच गर्दी केली होती. या घटनेबाबत अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. त्यांच्या पश्चात दोन मुलं सोना एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now