बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती वाढली ! जळगावातील हजार शिक्षक रडारवर

मार्च 14, 2026 11:27 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात बोगस शालार्थ आयडी काढून शिक्षकांची भरती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असून आता या घोटाळ्याची व्याप्ती वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष तपास पथकाने (SIT) प्रथमच संशयित शिक्षकांची सविस्तर यादी तयार केली असून त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील तब्बल १००४ शिक्षकांचा समावेश करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपासात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

SCHOLARSHIP EXAM jpg webp

या यादीतील अनेक शिक्षकांची नियुक्ती तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव आणि शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांच्या शेरा व स्वाक्षरीवर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र या नियुक्त्या नियमबाह्य आणि सदोष असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे. नितीन बच्छाव यांच्या कार्यकाळात ८५ संशयास्पद ड्राफ्ट तर भाऊसाहेब चव्हाण यांच्या काळात ७४७ शालार्थ ड्राफ्ट भरल्याचा संशय आहे.

राज्यभर चर्चेत असलेल्या या प्रकरणात सुरुवातीला नाशिक येथे भद्रकाली पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या तपासात जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच विविध शिक्षण संस्थांमधील अधिकारी आणि संस्थाचालकांवर संशयाची सुई फिरली. अनेक संबंधितांवर यापूर्वीच कायदेशीर कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात फिर्यादी असलेले भाऊसाहेब चव्हाण यांच्यावरही गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.

सध्या जळगाव जिल्ह्यातील तपासादरम्यान अधिकारी, शिक्षण संस्था आणि शिक्षकांची नावे असलेली यादी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठविण्यात आली आहे. या यादीत जळगावमधील ३५ हून अधिक शिक्षण संस्थांचा समावेश असून अनेक नियुक्ती आदेशांवर संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तपासणीदरम्यान काही शालार्थ आदेशांमधील कर्मचारी नावे, शाळेची माहिती किंवा आदेश क्रमांक हे अधिकृत नोंदींशी जुळत नसल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. काही ठिकाणी नियुक्ती प्रक्रियेची माहिती अपूर्ण असल्याने संबंधित आदेश संशयास्पद ठरवण्यात आले आहेत. तर काही प्रकरणांमध्ये आदेश वैध असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, काही कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी संभाजीनगर येथील दोन शिक्षण उपसंचालकांकडूनही निरीक्षण नोंदवण्यात आल्याचे समोर आले आहे. विविध शैक्षणिक संस्थांमधील नियुक्ती आदेश, शालार्थ ड्राफ्ट आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी करताना अनेक विसंगती आढळल्याने या संपूर्ण प्रकरणाची अधिक सखोल चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now