जळगाव लाईव्ह न्यूज । राजकारणात संधी आणि सोय या दोन गोष्टींना किती महत्त्व असते, याचा जिवंत नमुना म्हणजे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील, उर्फ ‘लकी टेलर’. रविवारी नाशिकमध्ये भाजपा नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. मात्र, त्यांच्या या ‘कमळ’ हाती धरण्याच्या निर्णयापेक्षा, त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या राजकीय रंगांचीच चर्चा रंगली आहे.

शिवसैनिक म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या लकी टेलर यांनी कालंतराने शिवसेनेची साथ सोडली. त्यानंतर गुलाबी स्वप्ने पाहत त्यांनी ‘बीआरएस’ या तेलंगणास्थित पक्षात प्रवेश केला. मात्र, तिथेही त्यांचे मन फार काळ रमले नाही. नुकत्याच झालेल्या निवडणूक काळात त्यांची जवळीक अचानक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याशी वाढली. मविआच्या नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून फिरणारे लकी टेलर आता अचानक भाजपच्या तंबूत दाखल झाल्याने राजकीय विश्लेषकांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

लकी टेलर यांच्या या ‘राजकीय कोलांटउड्यां’मुळे त्यांचे कट्टर समर्थक आणि कार्यकर्ते मात्र पूर्णपणे चक्रावून गेले आहेत. “आण्णांनी आतापर्यंत एकही पक्ष सोडला नाही” अशी टिप्पणी आता सामान्य मतदार करू लागले आहेत. कार्यकर्त्यांसमोर पेच पडला आहे की, कालपर्यंत ज्या भाजपच्या धोरणांवर टीका केली, आज त्याच पक्षाचा जयघोष कसा करायचा? सोशल मीडियावर तर ‘आण्णा, आता नेमका कोणता झेंडा घेऊ हाती?’ अशी चर्चा सुरु झाली आहे.
एका बाजूला माजी सभापती लक्ष्मण पाटील यांच्यासह माजी उपसभापती राजू पाटील, संदीप पाटील आणि दिलीप पाटील यांसारख्या वजनदार नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने बाजार समितीच्या राजकारणात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र दिसत असले, तरी लकी टेलर यांच्या भाजप प्रवेशामुळे सर्वसामान्यांमध्ये त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मतदारांना आता हे कोडं पडलंय की, आण्णा नेमके कोणत्या विचारधारेचे आहेत?







