जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यात हिवाळ्याची थंडी आता पूर्णपणे ओसरत असून उन्हाळ्याची चाहूल अधिक तीव्र होत आहे. फेब्रुवारी महिन्यातच तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने जळगावकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, काल मात्र कमाल तापमानात काहीशी घसरण नोंदवली गेली. गुरुवारी कमाल तापमान ३५.७ अंश सेल्सिअस इतके होते, तर किमान तापमान १८.३ अंश नोंदले गेले. त्यानंतर शुक्रवारी कमाल तापमान सुमारे २ अंशांनी घसरून ३३.४ अंशांवर आले, तर किमान तापमान १८.१ अंश इतके राहिले.

कमाल तापमानात घट झाली असली तरी दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता जाणवतच आहे. सकाळी व सायंकाळी वातावरणात किंचित गारवा असला, तरी दिवसाढवळ्या उकाडा कायम आहे. सकाळपासूनच उन्हाची कडाक्याची झळ जाणवत आहे. आता दरम्यान, पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३७ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. यामुळे मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाची झळ बसायला सुरुवात होणार असून उकाड्याने जळगावकर हैराण होणार आहे.







