जळगाव लाईव्ह न्यूज । राज्य सरकारने मद्यविक्रीची दुकाने वगळता इतर सर्व दुकानं, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापना २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी दिली असून यासंदर्भात अद्यादेशही जारी केला आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे लक्षात आले आहे. रात्री १० नंतर दुकाने उघडी ठेवल्यामुळे काही व्यापाऱ्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करून नियम स्पष्ट केले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार सहायक कामगार आयुक्तांनी पोलिस अधीक्षकांना लेखी पत्र देऊन संबंधित कायद्याची आठवण करून दिली. त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सर्व पोलिस ठाण्यांना सूचना जारी केल्या असून, विनाकारण दुकाने बंद करण्यास सक्ती करू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

या निर्णयामुळे जळगावातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता जिल्ह्यात २४ तास व्यवसायासंदर्भातील नियमांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवेदनानंतर हालचाल
नाथजानकी फाउंडेशनचे हर्षल सिखवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या अडचणी मांडल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाची दखल घेत सहायक कामगार आयुक्तांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले.
काय आहे नियम
दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ नुसार, ज्या दुकानांकडे वैध शॉप अॅक्ट परवाना आहे आणि १० पेक्षा कमी कामगार आहेत अशांन दुकाने २४ तास सुरू ठेवण्यास शासनाची परवानगी आहे. मद्य विक्रीची दुकाने सोडून इतर हॉटेल्स व व्यावसायिक दुकाने रात्रीच्या वेळी सुरू ठेवता येतील.
दरम्यान, परमिट रुम, बिअरबार, डान्सबार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक आणि अशा सर्व आस्थापना जेथे कोणत्याही प्रकारचे मद्य विक्री केली जाते, तसेच वाईन आणि सर्व प्रकारचे मद्य विक्री करणारी दुकाने अशा आस्थापनांच्या सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. अशा आस्थापना २४ तास सुरु ठेवता येणार नाहीत








