जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२६ । फेब्रुवारीच्या मध्यावर येताच जळगाव जिल्ह्यात हिवाळ्याची चाहूल जवळपास संपुष्टात आली असून दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका लक्षणीयरीत्या वाढू लागला आहे. सकाळच्या वेळी हलकी गारवा जाणवत असला तरी दुपारी मात्र तापमानात झपाट्याने वाढ होत असून उकाडा जाणवत आहे.

दरम्यान जळगाव जिल्ह्यात येत्या आठवडाभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून कमाल तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. या बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामावर चिंतेचे सावट पसरले आहे.

सध्या जळगावच्या किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात काल मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. ज्यात दिवसा उकाडा आणि रात्री गारवा जाणवला. सूर्यप्रकाश कमी असला तरी हवा उबदार राहिली. कमाल तापमान ३४ अंश आणि किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मात्र आजपासून तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.
आज दि.१८ पासून किमान तापमानाचा पारा घसरणार असून दि.२३ फेब्रुवारीपर्यंत हा पारा १३ अंशावर जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीच्या थंडीच्या प्रमाणात वाढ होणार आहे. दिवस मात्र ढगाळ वातावरणामुळे दमटता निर्माण होणार आहे. या बदलत्या दुहेरी स्थितीमुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
आगामी पाच दिवसाचा तापमान अंदाज?
दिनांक.. किमान आणि कमाल तापमान
दि. १८ : किमान – १६ … कमाल – ३३
दि. १९ : किमान – १७ … कमाल – ३४
दि. २० : किमान – १६ … कमाल – ३४
दि. २१ : किमान – १५ … कमाल – ३५
दि. २२ : किमान – १४ … कमाल – ३३
दरम्यान, जानेवारी-फेब्रुवारीत सुमारे १८ दिवस राहिलेल्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा, मका, गहू, कांदा आणि केळी यांसारख्या रब्बी पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. सकाळी कडाक्याची थंडी आणि दुपारी उकाडा अशा विचित्र वातावरणामुळे पिकांची वाढ खुंटली. केळी पिकाला या हवामानाचा मोठा फटका बसला. ढगाळ हवामानामुळे पिकांवर औषध फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी वर्गाचा उत्पादन खर्च वाढला.







