जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून । मुक्ताईनगर शहरात एकावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेनंतर शस्त्र दाखवून दहशत पसरविण्याचा धक्कादायक प्रकार करणाऱ्या चौघांना जमावाने पकडून चांगलाच चोप दिला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जमावाला शांत केले. दरम्यान, गोंधळात एकाने पळ काढला तर तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शहरातील प्रवर्तन चौकात बुऱ्हाणपूर रोडवरील देशी दारूचे दुकान आहे. या ठिकाणाहून हे चौघे दारू पिऊन बाहेर पडले व समोरच असलेल्या पान टपरीवर गेले. या ठिकाणी टपरीचालक बाहेर गेल्याने त्याची वृद्ध आई दुकान सांभाळत होती. या वृद्धेशी चौघांनी गळ्यातील मंगळसूत्र हेरून वाद घातला हा वाद ऐकून बाजूलाच असलेल्या मोबाईलच्या दुकानातून मोबाईल दुकान मालक सागर पाटील व त्याचे वडील ओंकार पाटील हे बाहेर येऊन वाद का करीत असे विचारताच चौघांनी दोघे पिता पुत्रांना बेदम मारहाण केली व धारदार शस्त्र काढले आणि ओंकार पाटील यांच्या गळ्यावर व छातीवर वार केले.
घटनेनंतर चौघे प्रवर्तन चौकात आले आणि रक्ताने माखलेल्या शस्त्र हातात घेऊन मुक्ताईनगरकरांना सार्वजनिक शिवीगाळ करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करू लागले. बराच वेळ पाहिल्यानंतर संतप्त जमावाने चौघांना बेदम मारहाण केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व जमावाला शांत केले. सदरील चौघांनी परिस्थिती पाहता पोलिसांनी देखील खाकी दाखवून चौघांना लाठीचा प्रसाद दिला. गोंधळाचा फायदा घेत एकाने पळ काढला तर तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.