जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. अशातच एरंडोल तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणारे पकडलेले दोन ट्रॅक्टरवर कुठलीही कारवाई न करता सोडून देण्यासाठी ३० हजारांची लाच घेताना दोन तलाठ्यांना एसीबीने रंगेहात अटक केली. नरेश भास्कर शिरूड (वय ४१, तलाठी उत्राण अहिर) व शिवाजी एकनाथ घोलप (वय ४६, तलाठी उत्राण गुजर) अशी दोघा लाचखोर तलाठ्यांची नावं असून या कारवाईदरम्यान त्यांच्याकडे असलेली १.७३ लाखांची रोकडही जप्त केली.

एरंडोल तालुक्यातील उत्राण अहिर व उत्राण गुजर सजा हद्दीतील हे दोन तलाठी कार्यरत आहेत. गिरणा नदीपात्रातून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तलाठी शिरुड यांनी मंगळवारी पकडले होते. त्यावर कुठलीही कारवाई न करता सोडून देण्यासाठी त्यांनी २५ हजार लाचेची मागणी केली. नंतर ही रक्कम वाढवून ३० हजार रुपये करण्यात आली.

यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा लावला. उत्राण येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वर असलेल्या एका खोलीत दोघा तलाठ्यांना ३० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. कारवाईदरम्यान तलाठी शिरुड याच्याकडे पथकाला १ लाख ७३ हजार ३०० रुपयांची रोकडे आढळली. याशिवाय एक व्हिस्कीची बाटली आणि मोबाइलही जप्त केला. दरम्यान, दोघा तलाठ्यांना ८० हजार रुपये वेतन आहे. या प्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द
ही कारवाई पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, अंमलदारप्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी व सचिन चाटे यांनी केली.












