जळगावात महापौर पदाचे आरक्षण अद्याप गुलदस्त्यात; इच्छुकांची धडधड वाढली..

जानेवारी 12, 2026 12:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता काही तासच उरले असून उद्या म्हणजे १३ जानेवारीपासून प्रचाराचा तोफा थंडावणार आहे. या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान तर दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. मात्र, अद्यापही महापौर पदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आणि सस्पेन्स निर्माण झाला आहे.

jalgaon manapa

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी तसेच अपक्षांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली प्राचारचा धडाका सुरु आहे. या निवडणुकीसाठी मतदान होऊन निकाल जाहीर होण्यास आता काही दिवसच उरले आहेत. तरीही जळगावचा महापौर सर्वसाधारण प्रवर्गातील होणार की राखीव जागेवरील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महायुतीसह महाविकास आघाडीचे लक्ष महापौर पदाकडे लागले असून मात्र आरक्षण अद्याप जाहीर न झाल्यामुळे दोन्ही आघाड्यांचा मोठा हिरमोड झाला असून, इच्छुकांची धडधड वाढली आहे. महापालिकेच्या नियमानुसार महापौर पदाचे आरक्षण राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत जाहीर केले जाते. मात्र, यंदा आरक्षणाची अधिसूचना अद्याप निघाली नाहीय.

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून आरक्षणाची सोडत केव्हा निघते, याकडे आता सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे आणि निवडणुकीला रिंगणात असलेल्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे. जळगावचे महापौर पद महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय की सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव राहणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

महापौर पदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने इच्छुक उमेदवारांची संपूर्ण रणनीती सध्या अडचणीत आली आहे. अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला असला, तरी अंतिम सत्ता-समीकरण महापौर पदाच्या आरक्षणावरच अवलंबून राहणार आहे. त्यामुळे अनेक दिग्गज नगरसेवक आणि संभाव्य उमेदवारांनी सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका स्वीकारली असून, पडद्यामागील हालचालींना मात्र जोर आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now