जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह एकीकके चोरट्यांनी धमाकूळ घातला असून अशातच स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. त्यात लाखो रुपये किमतीच्या नोटा जळून खाक झाल्या. ही घटना जळगाव एमआयडीसी परिसरातील जकात नाक्याजवळील एटीएम केंद्रात घडला.याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव ते अजिंठा रस्त्यावर एमआयडीसी परिसरातील जकात नाक्याजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. त्याठिकाणी शनिवारी पहाटे चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन कापून त्यातून रोकड लांबविण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी मशीनचा बराच भाग कटरने कापला व त्याच वेळी आतील नोटांनी पेट घेतला. त्यावेळी चोरट्यांनी तेथून पळ काढला.

आगीत एटीएममधील लाखो रुपयांची रोकड जळून खाक झाली. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फॉरेन्सिक टीमला बोलावून घटनास्थळाचे नमुने घेतले आहेत. घटनास्थळाची पाहणी केली असता गॅस कटरने एटीएम कापण्याचा प्रयत्न झाल्यामुळे आग लागल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एटीएममध्ये काही दिवसांपूर्वीच ११ लाख रुपयांची रोकड जमा केली होती. ग्राहकांनी किती रक्कम काढली व किती रक्कम शिल्लक होती, याची पडताळणी केल्यानंतर जळालेल्या रकमेचा आकडा स्पष्ट होणार आहे.
घटना सीसीटीव्हीत कैद
चोरीच्या प्रयत्नाची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यानुसार कारमधून आलेले चार जण एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. चोरट्यांनी एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. एरव्ही असे केल्यास त्या-त्या पोलिस ठाणे व बँकेच्या यंत्रणेला कॉल जातो, मात्र एटीएम केंद्राची सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याने असा कॉल गेला नसावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. एटीएम जळत असल्याचे एका रिक्षाचालकाच्या लक्षात आले. त्या वेळी एटीएमच्या बाजूला असलेल्या एका दुकानावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर रिक्षाचालकाने कॉल करून कळविले. त्यानंतर पोलिस व अग्नीशमन यंत्रणेला माहिती देण्यात आली.








