जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२६ । जळगाव महापालिकेत महायुतीचा बोलबाला दिसून आला आहे. अर्ज माघारी अखेर मतदानापूर्वीच भाजप-शिवसेनेचे प्रत्येकी ६ असे एकूण १२ उमेदवार बिनविरोध झाले असून त्यांचा निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.यामध्ये भाजपचे आमदार सुरेश भोळे आणि शिवसेनेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पुत्रांचा समावेश आहे. आता ६३ जागांसाठी ३२१ उमेदवार रिंगणात आहेत.

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी १०३८ उमेदवारांनी अर्ज केले होते. पैकी छाननीअंती ९०३ अर्ज वैध ठरले होते. १ आणि २ जानेवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत होती. अर्ज माघारी अखेर अनेक उमेदवारांनी माघारी घेल्याने काही प्रभागातील जागा बिनविरोध झाल्या आहेत. एकूण ७५ जागांपैकी महायुतीच्या १२ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये भाजपच्या ६ आणि शिंदे गटाच्या ६ उमेदवारांचा समावेश आहे.

माघार घेतलेल्या ३१७ उमेदवारांत सर्वाधिक ३०९ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनीही आपले अर्ज मागे घेतले आहेत. दरम्यान माघारीनंतर आता ६३ जागांसाठी ३२१ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये नऊ ठिकाणी पंचरंगी, चौरंगी व तिरंगी आठ, दुरंगी लढती पाच ठिकाणी होतील.











