जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावामधून धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात चौथी मुलगी झाल्याच्या रागातून पित्यानेच तीन दिवसांच्या पोटच्या मुलीची हत्या केली. कृष्णा राठोड असे अटक करण्यात आलेल्या निर्दयी पित्याचे नाव असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना 14 नोव्हेंबर रोजी घडली होती. सुरुवातीला कुटुंबीयांनी आंघोळ करताना मुलगी पडून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्यानुसार पहूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला.

चिमुकलेला उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान 14 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला होता. दीड महिन्यांनी वैद्यकीय अहवालात मुलीचा मृत्यू अपघाती नसून ठणक वस्तूच्या मारामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला.
तपासादरम्यान कृष्णा लालचंद राठोड या पित्यानेच चौथी मुलगी झाल्याच्या रागातून हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पहूर पोलिसांनी कृष्णा राठोड याला अटक करून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून समाजमन सुन्न झाले आहे.










