जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२५ । जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि वाढत्या मागणीमुळे जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्यासह चांदीच्या किमतीने नवे सर्वकालीन उच्चांकी गाठली आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी दरवाढ नोंदवण्यात आली असून यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.

जळगाव सराफ बाजारात सोमवारी दिवसभरात १९५७ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३८ हजार २० रूपयांच्या नवीन उच्चांकापर्यंत पोहोचले होते. यानंतर आज मंगळवारी सकाळी बाजार उघडल्यावर तब्बल २२६६ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याने तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४० हजार २८६ रूपयांच्या ऐतिहासिक उच्चांकापर्यंत मजल मारली.

गेल्या दोन दिवसात सोने दरात तब्बल ४ हजार २२३ रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे चांदीचा दर थेट २,०५,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. सोन्याचे दर दिवसागणिक नवनवे ऐतिहासिक उच्चांक गाठत असल्याने ग्राहकांसह सराफा व्यावसायिकही चक्रावले आहेत. अचानक वाढलेल्या दरांमुळे खरेदीसाठी आलेले ग्राहक संभ्रमात पडले असून, अनेकांनी खरेदी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दररोज वाढत आहेत. दरवाढीचा हा आलेख असाच कायम राहिला, तर येत्या काही दिवसांत सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम दीड लाखांच्या आसपास सहज पोहोचू शकतो, असा अंदाज काही सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला. पुढील काळाक किती आणि कसे दर वाढणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.











