जळगाव लाईव्ह न्यूज । राज्य शासनाच्या सहकार व पणन विभागाने किमान आधारभूत योजनेंतर्गत हमी भावाने धान्य खरेदीसाठी नोडल एजन्सी म्हणून बाजार समितीची निवड करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथमच भुसावळ बाजार समितीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले झाले. या केंद्रात एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनला प्रती क्विंटल ५ हजार ३२८ रुपये भाव मिळतो आहे.

भुसावळ तालुक्यात यापूर्वी सोयाबीन खरेदी केंद्र नव्हते. यंदा प्रथमच कृषी उत्पन्न बाजार समितीत हे केंद्र सुरु झाले. त्यानूसार सोमवारी (दि.१५) एनसीसीएफ व नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्राचे सभापती अनिल वारके यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

या वेळी समितीचे संचालक मंडळ व शेतकरी हजर होते. समितीच्या स्थापनेनंतर म्हणजे सन १९५६ नंतर प्रथमच अशा प्रकारचे खरेदी बाजार समितीने कार्यान्वित केले आहे. या ठिकाणी नोंदणी व खरेदी होणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती यांनी केले आहे. या ठिकाणी केंद्र सुरू झाल्यामुळे भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची चांगली सोय होणार आहे.












