जळगाव लाईव्ह न्यूज । जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातील 173 गावे आणि 95 गावे या दोन महत्त्वाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना नव्याने गती देत कामे पूर्ण करण्यासाठी तातडीची कार्यवाही सुरू असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले.सदस्य बबनराव यादव ( लोणीकर) यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले की, 173 गावे योजनेवर आतापर्यंत 226 कोटी खर्च झाला आहे. 146 गावांमध्ये योजनेचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित गावांतील काही तांत्रिक अडचणी आणि महामार्गाच्या कामामुळे झालेल्या अडथळ्यांचे निराकरण जलदगतीने सुरू आहे. ज्या गावांमध्ये टॅपिंग पॉईंट उपलब्ध आहेत, त्या गावांना लवकरच पाणीपुरवठा सुरू होणार आहे. 95 गावे प्रादेशिक योजना 87 गावांमध्ये यशस्वीपणे सुरू करण्यात आली असून उर्वरित ठिकाणी विजबिलाशी संबंधित मुद्दे सोडवण्यासाठी विभागाने तातडीची पावले उचलली आहेत. दोन दिवसांत सर्व बंद गावांचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

कामकाजातील त्रुटींची चौकशी सुरू असल्याचे सांगून मंत्री पाटील म्हणाले की, काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. संबंधित कंत्राटदारांनी जबाबदाऱ्या पार पाडाव्यात यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आवश्यक असल्यास दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात येईल. केंद्राकडून निधी मिळाल्यानंतर राज्य शासनाने 2100 कोटी रुपये त्वरित उपलब्ध करून पाणीपुरवठा प्रकल्पांना गती दिली आहे. लोकांना पाणी मिळणे ही शासनाची प्राथमिकता आहे. उर्वरित सर्व अडथळे दूर करून योजना पूर्ण क्षमतेने सुरू करणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.












