जळगाव लाईव्ह न्यूज । राज्य परिवहन विभागाने शाळांच्या सहलीबाबत काही महत्वाचे आदेश काढले आहे. त्यानुसार शाळांच्या सहली आता एसटी बसमधूनच होणार आहेत. खासगी प्रवासी बसने शालेय सहली घेऊन जाणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक तसेच उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे यापुढे शाळांच्या सहली सरकारी बसने म्हणजेच लालपरी घेऊनच कराव्या लागणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून अनेक शाळांकडून खासगी बस किंवा स्कूल बसने सहलीचे आयोजन केले जात असल्याची तक्रार ई-मेलद्वारे परिवहन विभागाला प्राप्त झाली होती. त्यानंतर हा आदेश काढण्यात आला आहे.

परिवहन विभागाच्या नियमानुसार, आता शाळांची सहल घेऊन जायची असेल तर एसटी बसचा वापर करावा लागेल. त्याचसोबत ५० विद्यार्थ्यांमागे ५ शिक्षक घेऊन जाणे बंधनकारक असेल. विद्यार्थीनी असतील तर महिला शिक्षक असणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर सहलींसाठी शिक्षण विभागाची जी नियमावली आहे त्या नियमावलीचे शाळांनी पालन करणे गरजेचे असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.






