जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२५ । उद्या म्हणजेच २ डिसेंबर रोजी राज्यासह जळगाव जिल्ह्यातील १८ नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आलीय. न्यायालयात अपिलात असलेल्या जळगाव जिल्ह्यातील १२ प्रभागातील निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. येथे २ डिसेंबरला मतदान व ३ रोजी मतमोजणी होणार नाही. त्याऐवजी २० ला मतदान व २१ रोजी मतमोजणी होईल.

जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपरिषद आणि २ नगर पंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये जामनेर, अमळनेर, भुसावळ, भडगाव, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, वरणगाव आणि यावल, या नगर परिषदांचा समावेश आहे तसेच मुक्ताईनगर आणि शेंदुर्णी नगर पंचायतीचा समावेश आहे. उद्या म्हणजेच २ डिसेंबर रोजी येथे निवडणूक मंगळवारी घेतली जाणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी मतदान केंद्रांवर करून ठेवली आहे.

त्यापूर्वी न्यायालयीन अपिलात असलेल्या जिल्ह्यातील अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा आणि भुसावळ नगरपालिकांमधील नगरसेवक पदाच्या एकुण १२ जागांवरील निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
या प्रभागाचा समावेश
यामध्ये अमळनेरमधील प्रभाग एक-अ, सावद्यातील प्रभाग दोन-ब, चार-ब आणि १०-ब, यावलमधील आठ-ब, वरणगावमधील १०-अ आणि १०-क, पाचोऱ्यातील ११-अ आणि १२-ब, भुसावळमधील पाच-ब आणि ११-ब, या १२ प्रभागातील निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याचे आदेश येऊन धडकले. येथे २ डिसेंबरला मतदान व ३ रोजी मतमोजणी होणार नाही. त्याऐवजी २० ला मतदान व २१ रोजी मतमोजणी होईल.
त्यानुसार, जिल्हाधिकारी चार तारखेला सुधारित निवडणूक कार्यक्रम घोषित करतील. त्यानंतर अर्ज भरण्यास सुरूवात होईल आणि १० तारखेपर्यंत अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू राहील. ११ तारखेला चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.









