जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२५ । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनाच्या जळगाव विभागात आतापर्यंत एकूण ४२ ई-शिवाई इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या असून आता आणखी ९९ बसेसचा ताफा लवकरच जळगावमध्ये दाखल होणार आहे. यामुळे जिल्हांतर्गत तसेच परजिल्ह्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होऊ शकणार आहे.

राज्य परिवहन विभागाच्या ई-बस प्रकल्पांतर्गत जळगाव विभागाला हा नवीन ताफा मिळणार आहे. संपूर्णत: इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर आधारित या बसेस केवळ पर्यावरणपूरक नसून त्यांची अंतर्गत सजावट आकर्षक व आरामदायी असल्याने अल्पावधीतच त्या प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत. प्रशस्त आसन व्यवस्था, निवांत प्रवास, आधुनिक सुरक्षा यंत्रणा आणि दर्जेदार वातानुकूलन यंत्रणा, यामुळे या बसेसचा प्रवास अधिक सुखद ठरत आहे.

एसटीच्या जळगाव विभागात आतापर्यंत एकूण ४२ ई-शिवाई इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. त्यात नऊ मीटर लांबीच्या १७ आणि १२ मीटर लांबीच्या २५ बसेसचा समावेश आहे. पैकी नऊ मीटरच्या १२ बसेस जळगाव आगाराला तसेच पाच बसेस चोपडा आगाराला देण्यात आल्या आहेत. तर १२ मीटरच्या १५ बसेस जळगाव आगाराला आणि १० बसेस चोपडा आगाराला देण्यात आल्या आहेत. नऊ मीटरच्या बसेस एकदा चार्ज केल्यानंतर साधारण २०० किलोमीटर तर १२ मीटरच्या बसेस साधारणपमे २८० किलोमीटरपर्यंत धावतात. त्यादृष्टीने जळगाव आणि चोपडा या दोन्ही आगारांनी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अकोला, बीड, नंदुरबार, धुळे, शिरपूर, शिंदखेडा, अमळनेर आणि रावेर या मार्गावर ई-शिवाई इलेक्ट्रिक बस सुरू केल्या आहेत.
पर्यावरणपूरक ई-शिवाई इलेक्ट्रिक बसेसमधील सुखकर प्रवासाचा आनंद घेण्यासाठी प्रवाशांची गर्दी होत आहे. या अनुषंगाने जळगाव विभागातील जळगावसह पाचोरा, चाळीसगाव आणि मुक्ताईनगर या तीन आगारात दुसऱ्या टप्प्यात तब्बल ९९ ई-शिवाई इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. त्यापैकी ३५ बसेस जळगाव आगारासाठी राखीव असतील. तर उर्वरित बसेस इतर आगारांना मिळतील.







