जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहराजवळील आसोदा उड्डाणपुलाच्या खालील रेल्वे मार्गालगत रेल्वेची धडक लागून एका ५७ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला. राजेंद्र रघुनाथ सपकाळे (वय ५७, रा. वाल्मीक नगर, जळगाव) असं मयताचे नाव असल्याचं समोर आले.

आसोदा उड्डाणपुलाजवळून जाणाऱ्या रेल्वे रुळावर हा अपघात झाला. रेल्वेची धडक लागल्याने संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे सोपान पाटील हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटत नसल्यामुळे पोलिसांनी ‘अनोळखी’ म्हणून नोंद केली होती. मात्र, काही वेळानंतर मृतदेहाची ओळख पटली. मयताचे वाल्मीक नगर मधील रहिवासी असलेल्या सपकाळे यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.









