जळगाव हादरले ! अवैध दारू विक्रेत्याकडून कंपनीतील दोन कामगारांवर गोळीबार, एकाची प्रकृती चिंताजनक

नोव्हेंबर 3, 2025 10:19 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरीछुपे अवैध धंदे सुरूच असून अशातच एक खळबळजनक घटना समोर आलीय. जळगाव शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) परिसरात कंपनीबाहेर अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने किरकोळ वादातून कंपनीतील दोन कामगारांवर गोळीबार केला. यात राजन शेख रफिउल्ला (वय २०) आणि अहेमद फिरोज शेख (वय २६) हे दोघे कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत

jl cr

नेमका प्रकार काय?

जळगाव एमआयडीसीमधील कंपनीतील कामगार सरफू शेख नाईट ड्युटीसाठी कंपनीत जात असताना, कंपनीजवळ असलेल्या एका टपरीवर थांबला. याच ठिकाणी दारु अड्ड्याचा चालक एकाला मारहाण करत होता. सरफू शेख याने हे पाहिले असता, दारु विक्रेत्याने त्यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीनंतर सरफ शेख याने कंपनीत काम करणाऱ्या आपले दोन्ही भाऊ राजन शेख आणि अहमद फिरोज शेख यांना मदतीसाठी बोलावले. दोघे भाऊ सरफूसह कंपनी बाहेर आले असता, त्या दारु विक्रेत्याने त्यांना देखील शिवीगाळ केली.

यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेने दारु विक्रेत्याला गावठी पिस्तुल दिले. त्या दारु विक्रेत्याने कामगारांच्या दिशेने चार ते पाच राऊंड फायर केले. या गोळीबारामध्ये राजन शेख रफिउल्ला आणि अहमद फिरोज शेख हे दोघे जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. दोघांवरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी राहुल बऱ्हाटे आणि त्याची साथीदार मोनाली राहुल बऱ्हाटे या दोघांचा पोलीस कसून शोध घेत असून, आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांना उत?

दरम्यान जळगाव शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी चोरीछुपे अवैध दारू विक्री केली जात आहे. या धंद्यांवर पोलिसांकडून ‘सोयीस्कर’पणे दुर्लक्ष केलं जात असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. त्यातच अवैध धंद्यांच्या कारणावरुन हाणामारीसह आता थेट गोळीबारासारख्या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात अवैध दारू व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे उघड झाले आहे. पोलीस यंत्रणेच्या नाकावर टिच्चून किंवा त्यांना गुंगारा देऊन हा अवैध व्यवसाय सुरू आहे.या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now