जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२५ । जळगावच्या सुवर्णबाजारात सोने आणि चांदीने विक्रमीउंची गाठल्यानंतर दोन्ही धातूंच्या किमतीत गेल्या काही दिवसांत घसरणही झाली. मात्र, बुधवारी या घसरगुंडीला ब्रेक लागून सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी गुरूवारी सकाळी दोन्ही धातुंच्या दरात पुन्हा मोठी घट नोंदवली गेल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.

जळगाव सराफ बाजारात आज गुरुवारी सकाळी सोने दरात प्रति तोळा १५४५ घट नोंदवली गेली. त्यामुळे २४ कॅरेट १० ग्रॅम सोने जीएसटीसह एक लाख २३ हजार ०८५ रूपयांपर्यंत खाली आले. त्याच सोबतच चांदी दरात २००० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५२ हजार ४४० रूपयांपर्यंत घसरली.

या आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसात सोने आणि चांदी दरात मोठी घट नोंदविली गेली. या दोन दिवसात सोने प्रती तोळ्यामागे ४७३८ रुपयांनी तर चांदी ८२४० रुपयांनी स्वस्त झाली आहे. मात्र काल बुधवारी दिवसभरात २२६६ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २४ हजार ६३० रूपयांपर्यंत पोहोचले. तर चांदीत ५१५० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५४ हजार ५०० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचली. मात्र आज दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाली.
दरम्यान, सोन्याच्या किमती कमी होण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे शी जिनपिंग यांच्यातील बैठकीदरम्यान अमेरिका-चीनमध्ये व्यापार करार होण्याची अपेक्षा, हे मुख्य कारण मानले जात आहे. याशिवाय, सुरक्षित आश्रयस्थान म्हणून डॉलर मजबूत होत आहे. भारत, कोरिया आणि इतर देशांसोबतच्या व्यापार करारांबद्दल अमेरिका सकारात्मक दिसत आहे. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर सोन्याचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त झाला आहे. कमी किमतीत सोन्यात गुंतवणूक करणारे आता विक्री करण्याच्या मानसिकतेत दिसत आहेत. लग्नाचा हंगाम पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. परंतु ज्यांना दागिने खरेदी करायचे आहेत त्यांनी ते आधीच खरेदी करून ठेवले आहेत.












