जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२५ । गत सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. या संकटातून शेतकरी सावरत नाही तोवर आता मागच्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस होत असून यात वेचणीवर आलेला कापूस ओला झाला. हा भिजून निघालेल्या कापूस वेचणीसाठी मजुरांनी आता उत्पादकांना घेरायला सुरुवात केली आहे.

अस्मानी संकटांमुळे जेमतेम हाताशी आलेल्या कापूस वेचणीसाठी मजूर प्रतिकिलो १० ते १२ रुपयांची मजुरी आकारत असून त्यातही कापूस ओला असल्याने व्यापाऱ्यांकडूनही भाव मिळत नसल्याने उत्पादकांभोवती पुन्हा एकदा संकटाचा फास आवळला गेला आहे.

पावसाळी कापसाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात मजुरांची शोधाशोध करायला सुरुवात केली. तशातच अतिवृष्टीसह पूर परिस्थितीने कापूस भिजून निघायला लागला. ‘ऑक्टोबर हीट’च्या कालावधीत या कापसाचा ओलावा दूर होईल, या शेतकऱ्यांच्या आशेवर पावसाने पाणी फेरले. ऐन दिवाळीत शेतशिवारात असलेला कापूस झाडावरच भिजला.
एकीकडे मजुरांचा तुटवडा जाणवत असताना कापूस वेचणीसाठी दरवाढ झाली. बहुतांश मजुरांनी कापसाच्या वेचणीसाठी प्रतिकिलो १० रुपयांची मजुरी आकारायला सुरुवात केली. आधीच ओल्या झालेल्या कापसामुळे वजनाचा मार शेतकऱ्यांना बसत असताना दुसरीकडे व्यापाऱ्यांनीही या ओल्या कापसाला ४ ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे उत्पादकांची दुहेरी कोंडी होत आहे.








