जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात एकीकडे घरफोडीच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाली आहे. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून लाखोंचा मुद्देमला लंपास केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेनं परिरात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुक्ताई नगर येथील पेट्रोल पंपावर दरोड्याची घटना ताजी असतानाच आता जळगावातील या चोरीने पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने जळगावातील त्यांच्या घराला कुलूप होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केली.

चोरट्यांनी एकनाथ खडसे यांच्या घरातील तळ मजला आणि पहिला मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून चोरी केली आहे. चोरट्यांनी खडसेंच्या घरातील सर्व सामान अस्थव्यस्थ केले आहे. कपाटामधील कपडे, पर्स इतर वस्तू चोरट्यांनी खाली फेकून दिल्या आहेत. घटनास्थळी जळगाव पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी केली जात आहे.
एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया
या चोरीच्या घटनेविषयी एकनाथ खडसे यांनी माहिती दिली. माझ्या रुममधील 5 ग्रॅमच्या 4 सोन्याच्या अंगठ्या आणि 35 हजार रुपये रोख होते. गोपाळच्या रुममध्ये त्याच्या पत्नीची गहुपोत होती. एकंदरीत त्यांच्या रुममधून सात आठ तोळ्याचे सोने चोरीला गेले आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. तसेच रक्षा खडसे यांची रुमही शेजारीच आहे. तिथेही सामान उचकलेले आहे. वॉचमन सुट्टीवर होता. रात्री केव्हा चोरी झाली हे सांगता येणार नाही. पोलिसांना या घटनेची आता सकाळी माहिती देण्यात आली. पोलीस दाखल झाले आहेत आणि ते तपास करत आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.










