जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा-शिरपूर बायपास रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या चोपडा शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपींकडून गावठी पिस्तूल, तलवारी आणि १३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे.

पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मध्यरात्री गोपनीय माहिती मिळाली की, शिरपूर बायपास रोडवर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर (क्र. MH 26 CH 1733) संशयास्पदरीत्या उभी आहे. या गाडीत काही इसम बराच वेळ थांबलेले असल्याचे समजताच त्यांनी तात्काळ एक पथक तयार केले. रणगाडा चौकानंतर बायपासलगत ती कार दिसून आली. गाडीबाहेर दोन जण पाळत ठेवताना तर पाच जण आत बसलेले होते. पोलिसांची चाहूल लागताच सर्वांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने घेराव घालून सातही जणांना पकडले.

झडतीदरम्यान, दोन संशयित आरोपींच्या कमरेला लोड केलेले गावठी कट्टे, गाडीत दोन तलवारी आणि एक रिकामे मॅगझीन मिळून आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दिलीपसिंह पवार, विक्रम बोरगे, अनिकेत सूर्यवंशी, अमनदीपसिंग राठोड, सद्दाम हुसेन (सर्व रा. नांदेड, संभाजीनगर) आणि चोपडा येथील अक्षय महाले व जवेश महाजन या सात गुन्हेगारांचा समावेश आहे. या प्रकरणी सातही आरोपींविरुद्ध संगनमताने दरोड्याची तयारी व शस्त्र बाळगल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








