जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२५ । रेल्वे रुळावर रील बनवणं दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं. रील बनवण्यासाठी रेल्वे रुळावर गेलेल्या दोघा तरुणांना अहमदाबाद–हावडा एक्स्प्रेसची धडक बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी चांदसर रेल्वे गेट परिसरात घडली. प्रशांत पवन खैरनार (वय १८) आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे (वय १८) असे मृत तरुणांची नावे आहेत.

सोशल मीडियावर रील स्टार होण्यासाठी अनेकजण आटापीटा करत असतात. वेगवेगळ्या प्रकारे रिल बनवून प्रसिद्ध होण्याच्या हव्यासापोटी दोन तरुणांना जीव गमावावा लागलाय. दोघंही पाळधी येथील महात्मा फुले नगर परिसरातील रहिवासी असून, एकमेकांचे चांगले मित्र होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रशांत आणि हर्षवर्धन रविवारी सकाळी रेल्वे ट्रॅकवर ‘रील’ शूट करत होते. ट्रॅकवर धोकादायक पद्धतीने उभे राहून ते व्हिडीओ बनवत असताना, धरणगावकडून वेगाने येणाऱ्या अहमदाबाद–हावडा एक्स्प्रेस गाडीचा त्यांना अंदाज आला नाही. भरधाव ट्रेनची धडक बसून दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
पाळधी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर मृत तरुणांच्या नातेवाईकांसह पाळधी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.










