जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२५ । दिवाळीपूर्वी राजस्थानमध्ये खासगी बसला लागलेल्या आगीत अनेक जणांचा मृत्यू झाला होता. त्यांनतर आज (२४ ऑक्टोबर) पहाटे लोक झोपेत असतानाच एक भयानक अपघात घडला. आंध्र प्रदेशच्या कुरनूल जिल्ह्यात व्होल्वो बसला भीषण आग लागली. या आगीमध्ये २० जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या कुरनूल जिल्ह्यामधील कल्लूर मंडलमधील चिन्नाटेकुरु गावाजवळ हा अपघात झाला. ही बस हैदराबादवरुन बंगळुरुकडे जात होती. बसमध्ये जवळपास 40 प्रवासी होते. याच दरम्यान बसने एका दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर ही दुचाकी बसच्या खाली अडकली आणि त्यामध्ये मोठा स्फोट झाला. दुचाकीमध्ये स्फोट होऊन लगेचच बसला भीषण आग लागली.

बसला लागलेली आग इतकी भीषण होती की प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्याची देखील संधी मिळाली नाही. काही प्रवाशांनी बसच्या काचा फोडून बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. तर अनेक प्रवाशांचा झोपेतच कोळसा झाला. या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय या घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.










