जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२५ । राज्यातून मान्सून माघारी परतत असतानाच आज गुरुवारी जळगावसह १३ जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट’चा इशारा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

आधीच गेल्या महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यातच राज्यात परतीचा पाऊस कोसळणार आहे. आज गुरुवारी जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पश्चिम छत्रपती संभाजीनगर, पूर्व अमरावती, बुलढाणा, अकोला, सह्याद्री घाटमाथा व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या १३ जिल्ह्यांना हवामान खात्यानं पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

जळगावातील तापमानात वाढ
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या तापमानात लक्षणीय घट होऊन गारठा जाणवत जाणवत असतानाच, वातावरणात अचानक बदल झालेला पाहायला मिळत आहे. काल बुधवारी जळगाव शहर व जिल्ह्यात सकाळपासून अंशतः ढगाळ वातावरण निर्माण झाले होते, तसेच कमाल व किमान तापमानातही वाढ नोंदवली गेली.
या बदलत्या हवामानामुळे आज १६ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, त्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दरम्यान कमाल तापमान ५ ते ६ अंशाने वाढल्याने १८ तारखेपासून पुढील काही दिवस ऑक्टोबर हीटचा फटका जळगावकरांना बसण्याची शक्यता आहे.








