जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२५ । भारतात सगळ्यात मोठ्या सणांपैकी एक असलेला दिवाळी सण आता काही दिवसांवर आल्याने गावी जाण्यासाठी अनेकजण एस.टी. ला पसंती देतात; परंतु एसटी व रेल्वेच्या गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाल्यामुळे अनेकांना खासगी प्रवासी गाड्यांतून गाव गाठवे लागते; मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्स वाहतूकदारांनी तिकीट दरात दुप्पट ते तिप्पट वाढ केली आहे. दिवाळीनिमित्त गावी निघालेल्या प्रवाशांची खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून आर्थिक लूट केली जात आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक नागरिक पुणे, मुंबईसह नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने स्थायिक झालेले आहेत. मात्र दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाकडून आतिरिक्त बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे. पण एसटी बस आणि रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सशिवाय पर्याय राहिलेला नाही. याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून घेतला जात आहे.

खासगी ट्रॅव्हल्स चालकांना नियमानुसार एसटी बसच्या दीडपट तिकीट दर आकारता येतो; परंतु पण, खासगी प्रवासी वाहतूक दारांकडून नियमित तिकीट दरापेक्षा दुप्पट ते तिप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त गावी जाणार्यांना आर्थिक झळ बसत आहे.
पुण्यासह मुंबईहुन जळगाव येण्यासाठी आजच्या (दि१३) तारखेला १००० रुपयांहून कमी पैसे लागणार मात्र, उद्यापासून यासाठी दुप्पटहुन अधिक पैसे मोजावे लागणार आहे. तर दिवाळी तोंडावर पुण्याहून जळगावसाठी तुम्हाला तब्बल २ हजार रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागणार आहे. सध्या खासगी बस तिकीट दरावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. सणासुदीच्या आणि गर्दीच्या हंगामात ट्रॅव्हल्सकडून मनमानी भाडे आकारले जात आहे. आर्थिक लूटमार करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा पश्न निर्माण होत आहे.
दुसरीकडे मात्र जळगावहुन पुणे मुंबईसाठी तुम्हाला १००० रुपयांहून कमी पैसे लागणार. पुण्याहून जळगावची सध्या एसटी बसचे तिकीट दर ६९९ रुपये इतके आहे. तर मुंबईहुन जळगावसाठी साधी/जलद/रातराणीचे दर ७३५ तर शिवशाहीचे दर १०८७ रुपये इतके आहे








