जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२५ । स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीला वेग आला आहे. याच दरम्यान जळगाव जिल्ह्यात एकनाथ शिंदेंच्या गटाकडून भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या माजी आमदारासह २५ माजी नगरसेवक भाजपची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे नंदुरबारमधील देखील २० माजी नगरसेवकांसह १०० सरपंच शिवसेनेत प्रवेश करणार आहे. हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे.

यामध्ये जळगावातील अमळनेरचे माजी आमदार आमदार शिरीष चौधरी यांचा समावेश आहे. आतापर्यंत शिरीष चौधरी यांनी भाजप पक्षाला पाठिंबा दिला आहे. मात्र आता त्यांनी भाजप पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत शिरीष चौधरी यांनी भाजप पक्षाला पाठिंबा दिला आहे.

जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येकी पाच मतदारसंघातील जागा जिंकून भाजपसह शिवसेनेने (एकनाथ शिंदे) आपले वर्चस्व सिद्ध केले असले, तरी जेवढ्या काही ठिकाणी शिंदे गटाचे सध्या वर्चस्व आहे तिथे भाजपने आपली माणसे पेरण्यास यापूर्वीच सुरूवात केली आहे. शिंदे गटाच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना भाजपमध्ये प्रवेश देण्यावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर, शिंदे गटानेही आता शांत न बसता भाजपला धक्का देण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील २५ माजी नगरसेवक, नंदुरबार येथील २० माजी नगरसेवक, १०० सरपंच तसेच कार्यकर्त्यांसोबत शिरीष चौधरी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चौधरी धनुष्यबाण हाती घेणार आहेत. हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिरीष चौधरी यांनी भाजपची साथ सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.









