जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२५ । केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील रक्षा ऑटो फुएल्स या पेट्रोल पंपावर गुरुवार रात्री दरोडा पडल्याची घटना घडली असून यात बंदुकीचा धाक दाखवत १ लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांनी पळवली.त्याच बरोबर कर्की आणि तडवेल येथील पेट्रोल पंपावरही दरोडा पडला. या घटनेनं खळबळ उडाली असून या दरोड्याबाबत आता माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मोठा संशय व्यक्त केला.

नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?
या दरोड्याच्या घटनेवर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, पेट्रोल पंपवर दरोडा घालणारे गुन्हे गार हे मध्यप्रदेशातून आल्याचा संशय आहे. ते कर्कीला पहिल्यांदा गेले, तिथून ते या पेट्रोल पंपावर आले. त्यानंतर मग ते वरांदा मार्गे फरार झाल्याचे दिसत आहे. मध्यरात्री मोटारसायकलवरून आलेल्या ५ दरोडेखोरांच्या हातात देशी कट्टे होते. त्यांनी पंपावरील कर्मचाऱ्यांवर बंदुकीचा धाक दाखवला. कर्मचाऱ्यांना मारहाण केली. केबिनमध्ये तोडफोड केली आणि सुमारे एक लाखांहून अधिक रोकड लुटून नेली. तसेच दरोड्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील सोबत नेला, असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.

या प्रकरणात पाचपैकी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून स्वतःच्या केंद्रीय मंत्री असलेल्या मुलीच्या पंपावर दरोडा पडल्याने एकनाथ खडसे यांनी या घटनेचे गांभीर्य व्यक्त करत थेट राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यांनी घटनास्थळी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. तसेच राज्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. एकीकडे केंद्रीय मंत्री असलेल्या माझ्या मुलीची मालमत्ता सुरक्षित नाही, तर मग सामान्य नागरिकांचे काय? मुक्ताईनगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे., असा घणाघात खडसेंनी केला.
यावेळी एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगरमधील अन्य एका गंभीर घटनेचा संदर्भ दिला. काही दिवसांपूर्वी रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाडीची घटना घडली होती. त्या घटनेतील आरोपी देखील अजूनपर्यंत पकडलेला नाही. याचा अर्थ पोलीस प्रशासनाचे गुन्हेगारांवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, असाही आरोप एकनाथ खडसेंनी केला.









