जळगावचे नवीन जिल्हाधिकारी रोहन घुगेंनी स्वीकारला पदभार ; पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना दिली सक्त ताकीद

ऑक्टोबर 9, 2025 3:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२५ । जळगाव जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून रोहन घुगे यांनी आज गुरूवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेचच प्रशासकीय कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली.

rohan ghuge2

दोन दिवसापूर्वी राज्य सरकारने काही IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात आयुष प्रसाद यांची नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यामुळे, त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले रोहन घुगे यांची नियुक्ती झाली आहे.

घुगे यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी म्हणून रोहन घुगे हे पहिल्यांदाच पदभार सांभाळत आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेचच प्रशासकीय कामांचा आढावा घेत, अधिकाऱ्यांशी संवाद साधत आपल्या कामकाजाची दिशा स्पष्ट केली.

जिल्हाधिकारी घुगे यांनी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली की, ‘कोणत्याही परिस्थितीत सामान्य नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कामात दिरंगाई किंवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.’ तसेच, त्यांनी विविध विभागांमध्ये रखडलेल्या विकासकामांना तातडीने गती देण्याबाबतच्या सूचनाही यावेळी दिल्या. जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेला गतिमान आणि पारदर्शक बनवण्यावर आपला भर राहील, असे संकेत त्यांनी पहिल्याच दिवशी दिले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now