जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील चॅट अड्डा नावाच्या कॉफी शॉपवर रामानंद पोलिसांनी छापा टाकून ३ मुले व ३ मुलींना अश्लील चाळे करताना पकडले. पोलिसांनी त्यांची नावे आणि पत्ता चारून समज देऊन सोडून दिले. मात्र कॅफेच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रामदास कॉलनीतील एम.जे. कॉलेज रोड परिसरात असलेल्या चॅट अड्डा नावाच्या कॉफी शॉपवर पडदे लावून शालेय आणि महाविद्यालयीन मुला-मुलींना जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे उघड झाले आहे. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला तत्काळ कारवाईची सूचना केली. पथकाने बुधवारी दुपारी चॅट अड्ड्यावर (अन्नपूर्णा फुड्स) छापा टाकला. तेव्हा अश्लील चाळे करताना कॉलेजियन्स आढळून आले.

पोलिसांना या कारवाई दरम्यान धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ‘चॅट अड्डा’ (अन्नपूर्णा फुड्स) या गाळ्यात कॉफी शॉपचा परवाना नसताना आणि खाद्यपदार्थ विक्रीची कोणतीही व्यवस्था नसताना, प्लायवूड आणि पार्टिकल बोर्डचे छोटे-छोटे, गोपनीय कंपार्टमेंट्स (कप्पे) तयार करण्यात आले होते. याप्रकरणी योगेश बारी यांनी फिर्याद दिली असून, व्यवस्थापक मयूर धोंडू राठोड (वय २५, रा. वाघनगर, जळगाव) याच्यावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










