जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरमधून रिक्षा व चारचाकी गाड्यांमध्ये गॅस भरण्याचे अवैध प्रकार सुरु आहेत. अशातच स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात गॅस सिलिंडर व रिफलिंग साहित्य असलेल्या घरावर कारवाई करत सिलिंडर व साहित्य जप्त केले. याप्रकरणी शेख अरबाज शेख अब्बास (२७, रा. पिंप्राळा हुडको) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंप्राळा हुडको परिसरातील एका घरामध्ये अवैध गॅस रिफलिंग सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने एक सिलिंडर, मोटार, वजनकाटा, गॅस भरण्याची नळी असे एकूण २४ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले.

याप्रकरणी पोहेकॉ. प्रवीण भालेराव यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शेख अरबाज शेख अब्बास याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि. सचिन रणशेवरे करीत आहेत.










