जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२५ । जळगाव जिल्ह्यातील भुसावळच्या कंडारीत किरकोळ वादातून जितेंद्र राजेंद्र साळुंखे (वय ४०, रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव) या तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान या प्रकरणातील आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात मुसक्या आवळल्या.

राजू उर्फ बाबू अशरक सपकाळे (वय ३८, रा. कांती चौक, शिवाजी नगर, जळगाव) आणि मयूर उर्फ विक्की दिपक अलोने (वय ३२, रा. बारसे नगर, शिवाजी नगर, जळगाव) असं अटक करण्यात आलेल्या दोघं संशयित आरोपींचे नाव असून प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.

जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात कुटुंबासह वास्तव्यास असलेला जितेंद्र साळुंखे हा जळगावच्या माजी महापौरांचा मुलगा व इतर दोघांसोबत भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे एका कामानिमित्त गेला होता. तिथे एका हॉटेलवर मद्यपान केल्यानंतर चौघांमध्ये वाद सुरू झाले. वादातून हाणामारी झाली. यानंतर जितेंद्र याला इतर तिघांनी धारदार शस्त्राने वार करून जागीच संपवले.
घटनेची माहिती मिळताच जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी आदेश दिले की खुनातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन प्रकरण उघडकीस आणावे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने रात्रभर प्रयत्न करून गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. प्राथमिक चौकशीत दोघा आरोपींची गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.









