जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतच असल्याचं दिसत असून अशातच जळगाव शहरात तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका पाटील (वय २७, रा. कासमवाडी) असे मृत तरुणाचे नाव असून यामुळे शहरात एकाच खळबळ उडाली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री जुना वाद उफाळून आल्याने दोन कुटुंबांमध्ये तुंबळ राडा झाला. या वादात ज्ञानेश्वर पाटील याच्यावर दोन तरुणांनी धारधार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात ज्ञानेश्वरच्या पोटावर, डाव्या मांडीवर व अंगावर वार झाले असून त्याचे मूत्रपिंड फाटले.

जखमी अवस्थेत त्याला तातडीने जीएमसी रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांची व परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन बंदोबस्त वाढवला. दरम्यान रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचे बघावयास मिळाले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.2) रात्री रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.











