जळगावकरांना खुशखबर! जिल्ह्यातील मध्यम 6 प्रकल्प फुल, गिरणा, वाघूर धरणे ‘इतके’ टक्के भरले?

सप्टेंबर 3, 2025 8:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२५ । जळगावसह राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र गेल्या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक मोठे आणि लहान प्रकल्पांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढला. विशेष अर्ध्या जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणात ९४ टक्के इतका जलसाठा झाला आहे. तर जळगाव शहराला पाणी पाणीपुरवठा करणारे वाघूर धरण ८१ टक्के भरले आहे. त्यामुळे वर्षभर जळगावकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

girna dam

जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यात गिरणा नदी व पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. यामुळे गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांपैकी सहा प्रकल्प पूर्ण भरले असून बोरी प्रकल्पात ३.३२१ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे गिरणा तसेच बोरी प्रकल्पातून लवकरच विसर्ग सोडला जाणार असल्याची शक्यता असल्याचे गिरणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी म्हटले आहे. त्यानुषंगाने नदीकाठच्या नागरिकांना तसेच संबंधीत यंत्रणांना सावधानतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

जळगाव जिल्ह्यात सलग दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान या पावसामुळे जिल्ह्यातील १४ प्रकल्पांपैकी सहा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गिरणा, हतनूर आणि वाघूर तीन मोठ्या प्रकल्पांपैकी गिरणा ९४ टक्के तर वाघूर ८१ तर मध्यम प्रकल्पांपैकी बोरी प्रकल्पात ९० टक्के जलसाठा झाला आहे.

मध्यम प्रकल्प बोरीतून केव्हाही विसर्ग होणार

मध्यम प्रकल्पापैकी बोरी प्रकल्पात सद्यस्थितीत ९० टक्केपर्यंत साठा होत असून गेल्या २४ तासात ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून ३.३२१ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. प्रकल्पात होत असलेली पाण्याची आवक पाहता पातळी नियंत्रणासाठी प्रकल्पातून केव्हाही विसर्ग सोडण्यात येईल. बोरी नदीकाठ नजीक गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये अथवा पशुधन नेऊ नये असा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

हतनूर धरणामधून ३७२७४ क्यूसेक विसर्ग

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हतनूर प्रकल्पात ४४. १६ टक्के जलसाठा आहे. गेल्या २४ तासात ९३. १६ दशलक्ष घनमीटर अर्थात ३. २९ टिएमसी पाण्याची आवक झाली आहे. प्रकल्पाचे सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून ३७ हजार २७४ क्यूसेकचा विसर्ग केला जात आहे. मन्याड, अंजनी मधून विसर्ग लघू व मध्यम प्रकल्पापैकी अभोरा, मंगरूळ, सुकी, अंजनी, मन्याड आणि तोंडापूर असे सहा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून मन्याड मधून १०८३ क्यूसेक आणि अंजनी प्रकल्पाच्या २ दरवाजातून ७० क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now