जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसात गांजा जप्तीच्या अनेक घटना समोर आल्या. अशीच एक घटना भुसावळ शहरातून समोर आलीय. ज्यात स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत गांजाची वाहतूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका युवकाला पाठलाग करून रंगेहाथ पकडले. या कारवाईत दोन लाख 90 हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनारसिंग वालसिंग भिलाला (वय ३०, रा. शमलकोट, मध्य प्रदेश) असं अटक केलेल्याचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गोपाळ गव्हाळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक व्यक्ती मोटारसायकल वरून भुसावळ शहरात गांजाची बेकायदेशीर वाहतूक करत आहे. सदरची माहिती वरिष्ठांना कळविली असता स्थानिक गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलिसांचे पथक हॉटेल सुरुची समोरील नागपूरकडे जाणाऱ्या महामार्गावर सापळा रचला.

या वेळी एक संशयित युवक मोटारसायकलवरून येताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो पसार झाला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलवर (एमपी ०९ व्हीएम ४३९५) ठेवलेल्या गोणीत दोन प्लास्टिक पिशव्यांमध्ये १० किलो २७५ ग्रॅम गांजा होता. बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे २ लाख ५ हजार ५०० रुपये आहे. या कारवाईत ७५ हजारांची दुचाकी, १० हजारांचा मोबाइल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी केली.
या प्रकरणी संशयित अनारसिंग भिलाला याला न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. २५) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. संशयिताने गांजा कोठून आणला, कोठे घेऊन जात होता याची माहिती काढण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राहूल वाघ यांनी दिली.












