जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२५ । मध्य प्रदेश व विदर्भात झालेल्या जोरदार पावसामुळे तापी व पूर्णा नदीला पूर आला असून परिणामी हतनूर धरण पातळीत वाढ होत असल्याने आज दि. २० ऑगस्ट दुपारी १२ वाजता हतनूर धरणाचे ४१ पैकी २० दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. याद्वारे धरणातून ३५१७ क्युमेक्स (१२४२०३ क्युसेक्स) इतका प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तापी नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारनंतर मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी हतनूरमधून मोठा विसर्ग झाला. पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या मध्य प्रदेश व विदर्भात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणाची जलपातळी वाढली आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक विसर्ग मंगळवारी करण्यात आला. सोमवारी धरणाचे ६ दरवाजे पूर्ण तर १४ दरवाजे एक मीटरने असे एकूण २० दरवाजांतून प्रतिसेकंद ६४ हजार ७३२ क्युसेक वेगाने विसर्ग झाला होता. यानंतर मंगळवारी २४ दरवाजे पूर्ण तर ६ दरवाजे एक मीटर अशा एकूण ३० दरवाजांमधून विसर्ग झाला.

यांनतर आज २० दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. याद्वारे धरणातून ३५१७ क्युमेक्स (१२४२०३ क्युसेक्स) इतका प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला आहे, अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.
नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्या बाबतचे निर्देश दिले आहेत.याबाबत जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे. संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदारांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही सांगण्यात आले.








