जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२५ । राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या घटक पक्षात प्रवेश करतानाच्या सातत्याने बातम्या समोर येत आहे. मात्र यातच आता खान्देशात काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. नंदुरबार येथील आदिवासी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले भाजपचे नेते व माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

नुकतीच पद्माकर वळवी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. यानंतर अजित पवार यांचा आज (ता.17) जळगाव दौऱ्यावर असून या दौऱ्यात पद्माकर वळवी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. पण या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

वळवी यांनी बुलढाणा येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “पद्माकर वळवी यांच्या काँग्रेस प्रवेशाने नंदूरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला आणखी ताकद मिळेल. काँग्रेसचा विचार हाच सर्वांना सोबत घेऊन जाणारा तसेच लोकशाही व संविधान अबाधित राखणारा पक्ष आहे. इतर पक्षातूनही आणखी अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊ इच्छूक आहेत”.
दरम्यान, राहुल गांधी हे 2024 मध्ये नंदुरबार दौऱ्यावर असताना, त्याचवेळी पद्माकर वळवी यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसकडून मंत्रिपद भूषवलेले पद्माकर वळवी हे तीन वेळा आमदार झाले आहेत. अनेक दिवसांपासून पद्माकर वळवी हे राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरेही उपस्थित होते.












