जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू माफियांचा धुमाकूळ सुरूच आहे. महसूल प्रशासन आणि पोलिसांकडून कारवाया केल्या जात असल्या तरी अवैध वाळू वाहतूक सुरूच आहे. अशातच भडगावच्या वाक गावाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर भडगांव महसूल प्रशासनाने कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर भडगाव येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रॅक्टरवर लवकरच दंडात्मक कारवाई केली जाईल, असे ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईमध्ये तहसीलदार शीतल सोलाट, नायब तहसीलदार सुधीर सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी संजय सोनवणे, अविनाश जंजाळे, समाधान हुलहुले, शुभम चोपडा, प्रशांत कुंभारे, ग्राम महसूल सेवक समाधान माळी, किरण मोरे, नितीन मोरे, विशाल सूर्यवंशी आणि चालक लोकेश वाघ यांचा समावेश होता.

स्थानिक शेतकऱ्यांनी या कारवाईचे स्वागत केले असून, वाक येथील गिरणा नदीपात्रातून पाचोरा, पारोळा, आणि धुळे येथून येणारे डंपर आणि ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक करतात, त्यामुळे या भागाकडे पोलीस आणि महसूल विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन ही अवैध वाहतूक तात्काळ थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. भविष्यात असे डंपर आणि ट्रॅक्टर आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.










