जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२५ । गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जळगावसह राज्यात कमबॅक केलं असून आजपासून आगामी पाच दिवस राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामान विभागाकडूनही आज काही भागात येलो तर काही भागात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय. विशेष जळगाव जिल्ह्याला देखील आजपासून आगामी तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज राज्यातील विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून येलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा सांगली, छत्रपती संभाजीनगर,नांदेड, परभणी, बीड, सोलापूर, जळगाव, गडचिरोली या भागात देखील आज पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा काही भागांमध्ये दिला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्राला मान्सूचा येलो अलर्ट जारी केलाय. मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भाला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढील पाऊस दिवस राज्यातील काही भागात अतिमुसळधार पाऊस होणार आहे. पुढील पाच दिवस राज्यासाठी धोक्याचे असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
जळगावला आगामी तीन दिवस अलर्ट
जळगाव जिल्ह्यात मागच्या १५ दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. दुसरीकडे तापमानात वाढ झाल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे. यातच पावसाअभावी खरिपाच्या पिकांनी माना खाली टाकल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला. पिकांना पावसाची गरज होती. मात्र आता राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून जळगाव जिल्ह्याला देखील आजपासून १६ तारखेपर्यंत पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्यानं दिला आहे. बुधवारी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे खरिपाच्या पिकांना जीवनदान मिळाले.








