ब्रेक घेतलेल्या पावसाबाबत IMD चा दिलासा देणारा अंदाज; या जिल्ह्यांना अलर्ट जारी, खान्देशात पावसाची स्थिती काय?

ऑगस्ट 5, 2025 12:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२५ । मागच्या काही दिवसापासून राज्यात पावसाने ब्रेक घेतला आहे. दुसरीकडे तापमानात वाढ होऊन उकाडा वाढला आहे. दरम्यान पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पावसाअभावी खरिपाची पिके मान खाली टाकू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा मात्र चातकाप्रमाणे आभाळाकडे लागल्या आहेत. अशातच आता हवामान खात्याने दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे. आजपासून राज्यातील काही भागांत पुन्हा एकदा पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

rain 2 jpg webp

हवामान खात्याने आज महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र आकाश ढगाळ कायम राहणार असल्याचं म्हटलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारी विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडू शकतात.

या जिल्ह्यांना अलर्ट?

या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे उकाडा कायम राहण्याची चिन्हे आहेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे.पावसाचा हा अंदाज खरीप पिकांसाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता असून, शेतकरी वर्गाला दिलासा मिळू शकतो. मात्र, विजांच्या कडकडाटामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून हवामानाच्या बदलत्या स्थितीकडे लक्ष ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

खान्देशातील पावसाची स्थिती?
दरम्यान राज्यात ब्रेक घेतल्याने तापमानात वाढ होऊन उकाडा वाढला आहे. खान्देशातील जळगावमध्ये तापमान ३३ अंशावर पोहोचले आहे. जळगावकर पावसाची प्रतीक्षा करत आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, या भागांमध्ये हवामान खात्याने कोणतीही सतर्कतेची सूचना अथवा इशारा दिलेला नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now