जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२५ । महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आलीय. ती म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये रमी खेळल्यामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी होत असून यामुळे त्यांच्याकडून कृषिमंत्रीपद काढून घेतले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे मोठ्या घडामोडी होत आहेत. इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रीपद काढून घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून राजीनामा न घेता कृषिमंत्रीपद दुसऱ्या नेत्याकडे सोपवले जाऊ शकते अशी चर्चा आहे.

कृषिमंत्रीपदाबाबतच्या निर्णयाची घोषणा लवकरच होणार असल्याची शक्यता आहे. मकरंद पाटील किंवा दत्ता भरणे यांच्यापैकी एकाकडे कृषिमंत्रीपदाचा भार दिला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील यांच्याकडील एक खाते माणिकराव कोकाटे यांना दिले जाऊ शकते असे म्हटले जात आहे. कोकाटे यांना क्रीडा खाते मिळणार असल्याची चर्चा आहे.
मात्र दुसरीकडे कृषीखात्यासाठी धनंजय मुंडे हे लॉबिंग करत असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोड होणार असल्याचं बोललं जात आहे.











