जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२५ । राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना राबविली जात असून याद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात दिले जात आहे. मात्र या योजनेचा 14 हजार पेक्षा जास्त लाडक्या भावांनी देखील लाभ घेतल्याचं उघड झाले आहे. यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून त्यामुळे पुरुष लाभार्थी झालेच कसे? याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आता या पुरुषांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.

काल मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेचा पुरुषांनी लाभ कसा घेतला, सरकारची फसवणूक झाली असेल तर ही बाब गंभीर आहे. करावाई करा, असे आदेश दिले. या बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थ्यांच्या छाननीबाबत आणि विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी महिलांनी घेतला आहे, असं समोर आल्यास वसूली केली जाईल. २६ लाख लाभार्थी महिलांचा डेटा आम्हाला दिला आहे. आता त्यात अपात्र किती याची छाननी केली जात आहे.

तसेच जवळपास १४ हजारांपेक्षा जास्त पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. याबाबत आदिती तटकरे म्हणाल्या की, काही महिलांच्या नावे बँक खाती नसतील तर पुरुषांच्या नावाने असलेल्या खात्यात जमा झाल्याची शक्यता आहे. ही बाब आम्ही तपासून पाहत आहोत. दरम्यान, सरकारी कर्मचारी महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला असेल तर वसुली केली जाईल, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आधीही स्पष्ट केले आहे.












