जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२५ । महाराष्ट्रात मान्सूनचा जोर काही प्रमाणात ओसरल्यासारखा वाटत असला तरी राज्यातील काही भागांमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मागच्या तीन ते चार दिवसापासून पावसाची रिपरिप सुरु आहे. यामुळे खरिपाच्या पिकांना जीवनदान मिळाले असून जिल्ह्यात अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.

आज राज्यातील कोणत्या जिल्ह्याना अलर्ट
हवामान खात्यानं आज (ता. ३०) कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याचा घाटमाथा, तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जळगाव जिल्ह्यातील हवामान स्थिती?
खरंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून सक्रिय झाला आहे. परिणामी मागच्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी कायम राहिली. यामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळाले आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान २८ अंशांवर स्थिरावले. मंगळवारी जळगावचे तापमान कमाल तापमान २७.७ अंश इतके होते तर रात्रीचे किमान तापमान २३.४ अंश इतके होते. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. दरम्यान आज हलक्या पावसाचा अंदाज असून आगामी दोन ते तीन दिवस जिल्ह्यात हीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.








