Jalgaon : शेतात केळी लागवड नसताना पीकविमा काढला ; जिल्ह्यात ‘एवढे’ शेतकरी बोगस आढळले..

जुलै 29, 2025 2:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात गेल्या हंगामात हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत एकूण ७२ हजार ६८० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता, मात्र त्यात अनेक शेतकऱ्यांनी शेतात केळी लागवड नसताना पीकविमा काढल्याच्या तक्रारी प्राप्त होत्या. या तक्रारींची पडताळणी केल्यानंतर, जिल्ह्यात ७३३ शेतकरी बोगस आढळून आले आहेत, तर दोन हजार ९८९ शेतकऱ्यांनी पडताळणी टाळली असल्याचा अहवाल समोर आला आहे.

jalgaon banana

त्यामुळे प्रत्यक्षात केळी लागवड नसलेले व पीकविमा काढलेले, यासह दुसऱ्याच्या शेतातील सातबारा वापरून पीकविमा काढलेले, कृषी विभाग व विमा कंपनीच्या पडताळणीला सामोरे न गेलेले शेतकरी विमा योजनेपासून बाद होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाकडून हा सर्व अहवाल राज्य कृषी आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे, त्यामुळे याबाबत अंतिम अहवालावर कृषी आयुक्तांकडून निर्णय घेण्यात येणार आहे.

कृषी विभाग व पीकविमा कंपनीकडून जिल्ह्यात केळीच्या क्षेत्राची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान २ हजार ९८९ शेतकऱ्यांनी ही पडताळणी करून घेतली नाही. त्यामुळे आता हे शेतकरीदेखील बाद ठरविले जाण्याची शक्यता आहे, तर लागवड क्षेत्रापेक्षा अधिकच्या क्षेत्रावर ज्या १ हजार ११५ शेतकऱ्यांनी विमा काढला आहे, त्या शेतकऱ्यांना अधिकृत क्षेत्रावरीलच नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे, अधिकच्या क्षेत्रावरील भरपाईची रक्कम त्या शेतकऱ्यांना दिली जाणार नाही.

शेतात केळी नसताना, केळी पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांची पडताळणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. तो अहवाल आता प्राप्त झालेला आहे. नुसार ७३३ शेतकरीबोगस आढळून आलेले आहेत. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी पडताळणी करून घेतली नाही, अशा शेतकऱ्यांबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय घेण्यात येणार आहे.

  • कुर्बान तडवी, जिल्हा कृषी अधीक्षक, जळगाव

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now